धुळे | धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस शिपायाला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर आणि पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे (पश्चिम देवपूर पोलीस ठाणे) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या सासऱ्यांच्या नावावर धुळे तालुक्यातील वलवाडी येथे घर आहे. या घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून एका दाम्पत्याने २०१५ मध्ये एका वित्त कंपनीकडून ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदाराच्या सासऱ्यांनी धुळे न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयात सकारात्मक अहवाल सादर करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत ३ ऑगस्ट रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार ४ ऑगस्ट रोजी एसीबीने सापळा रचला.
पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस शिपाई अविनाश सादरे यांनी तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.















Discussion about this post