धरणगाव । जळगाव-धरणगाव रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ एसटी बस, खडीने भरलेला ट्रॉला (कंटेनर) आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण त्रिकोणी अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या या अपघातात एसटी चालकासह ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून शिरपूरकडे जाणारी एसटी बस (एमएच २० बीएल २०३६) आणि खडीने भरलेला ट्रॉला (एमएच १८ बीझेड ३२३२) धरणगावच्या दिशेने जात होते. त्याचवेळी धरणगावकडून जळगावकडे येणारा आयशर टेम्पो समोरून येत असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात तिन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. धडकेनंतर खडीने भरलेला ट्रॉला रस्त्याच्या कडेला पलटी झाला, तर आयशरच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
धडकेनंतर आयशरमधील चालक व प्रवासी वाहनात अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी मोठ्या शर्थीने बचावकार्य करत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
जखमींची नावे
या अपघातात एसटी चालक भाऊसाहेब बाबुलाल पाटील (वय ४९, रा. शिरपूर), वाहक भावना शरद पाटील (रा. शिरपूर), आयशर चालक भगवान कोळी, खटाबाई मधुकर न्हावी (रा. लोण, ता. धरणगाव), गजानन पाटील, सुमनबाई पाटील यांच्यासह एकूण ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. उर्वरित जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.















Discussion about this post