मुंबई । बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ या तीव्र चक्रीवादळाचा आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आता महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. या दोन हवामान प्रणालींच्या संयुक्त परिणामामुळे राज्यात वादळी पावसाचे अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आज २९ ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक भागांत जोरदार वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता असून यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे घाटमाथा, मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, काही ठिकाणी मुसळधार सरी आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मागील २४ तासांमध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहिला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्यातील सर्वाधिक ८० मिमी पाऊस, तर पुण्याच्या इंदापूर आणि सिंधुदुर्गच्या देवगड येथे प्रत्येकी ५० मिमी पावसाची नोंद झाली. तापमानाच्या बाबतीत, चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ३३.६ अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदले गेले, तर इतर भागात तापमानात चढ-उतार दिसून आले.















Discussion about this post