जळगाव । ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शरद पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळ परिसरात कार्यकर्त्यांची भलीमोठी रीघ लागली होती. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत शरद पवार यांचे स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दोन्ही गटांच्या नेत्यांनी शरद पवार यांचे स्वागत केल्याने विमानतळावरील हा क्षण विशेष चर्चेचा ठरला.
दरम्यान, शरद पवार विमानतळावर दाखल होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ आणि ‘शरद पवार’ अशा जयघोषाने संपूर्ण विमानतळ परिसर दणाणून गेला. पवार यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्याने विमानतळावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.















Discussion about this post