नवी दिल्ली। निवडणूक प्रक्रियेत अनियमितता आणि ‘वोट चोरी’ होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महिनाभर ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत आंदोलनाची माहिती दिली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला. काँग्रेसने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत त्याच्यावर टीकाही केली.

संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ‘इंडिया’ आघाडीतील खासदार संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढणार आहेत. त्यानंतर १० ते २० ऑक्टोबरदरम्यान जिल्हास्तरावर निदर्शने करण्यात येणार आहेत.तसेच २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत देशभरातील राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये ‘वोट बचाओ, देश बचाओ, CEC हटाओ’ या घोषणेसह रॅली आणि गावपातळीवर चौपाल घेण्यात येणार आहेत.
मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याचा दावा करणाऱ्या नागरिकांपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते पोहोचणार आहेत. संबंधित मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार असल्याचे पक्षाने सांगितले.
काँग्रेसच्या तीन प्रमुख मागण्या
काँग्रेसने आंदोलनाच्या माध्यमातून तीन प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, सध्या सुरू असलेली मतदार याद्यांची पुनरीक्षण प्रक्रिया रद्द करावी आणि आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
दरम्यान, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम आदमी पार्टी (AAP), डीएमके (DMK), बीजेडी (BJD) यांच्यासह इतर विरोधी पक्षांनाही काँग्रेसने आवाहन केले आहे.















Discussion about this post