चाळीसगाव | जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चाळीसगाव येथील उपविभागीय अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांना रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे चाळीसगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून दोघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदीप विरूचंद गमे यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मित्राने मौजे दहिवद येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण व गावहाळाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे १० लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल मंजूर होण्यासाठी मोजमाप पुस्तिकेत नोंदी करून मूल्यांकन करणे आवश्यक होते. संबंधित फाईल पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांच्याकडे पाठविण्यात आली होती.
दरम्यान, ३ जुलै २०२६ रोजी तक्रारदार यांनी निनावे यांची भेट घेतली असता, कामाचे बिल मंजूर करण्यासाठी एकूण बिलाच्या १ टक्के रकमेची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर ७ हजार रुपयांमध्ये व्यवहार निश्चित करण्यात आला. याबाबत तक्रारदार यांनी ७ जुलै रोजी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने सापळा रचला. त्यावेळी उपविभागीय अभियंता निनावे यांनी तक्रारदार यांच्याकडून ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम त्यांच्या सहायक कुलदीप गमे यांच्या हस्ते स्वीकारली. लाच स्वीकारताच ACBच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे व प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे तसेच त्यांच्या पथकातील अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील आणि जगदीश बडगुजर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.















Discussion about this post