राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांतील खरीप पिके अडचणीत आली असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जात असतानाच नांदेडमधील एका आढावा बैठकीतील प्रकार चर्चेत आला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्री आणि लोकप्रतिनिधींसाठी काजू-बदामाचा पाहुणचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारावरून आता टीका होत आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे १८ आणि १९ सप्टेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर असून दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. १९ सप्टेंबर रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान मंत्री आणि लोकप्रतिनिधींसाठी काजू-बदाम ठेवण्यात आल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान यावर चर्चा सुरू असताना बैठकीत असा पाहुणचार करण्यात आल्याने या प्रकारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर काजू-बदामाच्या प्लेट हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “अधिकाऱ्यांना डोकं नाहीये का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
राज्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा
दरम्यान, राज्यातील पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामावर परिणाम झाला असून सरकारने ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीआरएफच्या निकषांनुसार पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे नांदेडसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.















Discussion about this post