जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने इच्छुक उमेदवारांनी महापालिकेत मोठी गर्दी केल्याचं दिसून आले.
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबरपर्यंत आहे. यामुळे मनपा निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस उरले आहे.
याच पार्श्वभूमीवर इच्छुकांची प्रचंड धावपळ पाहायला मिळत आहे. आज, सोमवार २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासूनच जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
समर्थकांचा जल्लोष आणि गर्दी अनेक दिवसांपासून जागावाटपाचा पेच आणि पक्षांतर्गत चर्चेमुळे उमेदवारी अर्ज भरण्याचे प्रमाण संथ होते. मात्र, आता मुदत संपण्यात येणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी आज सकाळपासून गर्दी केली. उमेदवारांसोबतच त्यांचे शेकडो समर्थक पालिकेच्या आवारात जमा झाल्याने संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. प्रत्येक प्रभागातील इच्छूक उमेदवार आपले शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचत होते.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अर्जाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. जळगाव शहर पोलिसांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच बॅरिकेड्स लावून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. केवळ उमेदवार आणि मोजक्याच व्यक्तींना आत प्रवेश दिला जात असून, गर्दीला प्रवेशद्वाराबाहेरच थोपवण्यात आले आहे.















Discussion about this post