नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेत बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ६ नोव्हेंबरला १२१ जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला १२२ जागांसाठी मतदान होईल. निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर केले जातील. राज्यात एकूण ९०,७१२ मतदान केंद्रे उभारली गेली आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक तारखांची घोषणा करताना सांगितले की, २४ जूनपासून मतदार यादीचे विशेष तपासणी अभियान (एसआयआर एक्सरसाइज) राबवले गेले. या अभियानानंतर अंतिम मतदार यादी सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. नामांकन दाखल करण्याच्या तारखेनंतर जारी होणारी मतदार यादी अंतिम असेल आणि त्यानंतर कोणतेही नाव जोडले जाणार नाही.
कुमार यांनी पुढे सांगितले की, यंदा बिहारमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवली गेली आहे. राज्यात एकूण ७.४२ कोटी मतदार आहेत. निवडणुकीत चार लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी होत आहेत. १०० वर्षांहून अधिक वयाच्या मतदारांची संख्या १४ हजार आहे. तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या १४ लाख आहे.
बिहारमधील एकूण २४३ विधानसभा जागांपैकी ३८ जागा अनुसूचित जातींसाठी (एससी) तर दोन जागा अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयूच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) युतीला बहुमत मिळाले होते. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल (राजद) सर्वांत मोठा पक्ष ठरला होता, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. यंदाच्या निवडणुकीतही राजकीय पक्षांमधील चढाओढ तीव्र होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post