भुसावळ । भुसावळ तालुक्यात अवैध गावठी दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात तालुका पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई केली. दिवाळी आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत १० जणांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तब्बल २ हजार ८०० लिटर सडवा रसायन नष्ट करण्यात आले. तसेच २७० लिटर तयार गावठी दारूसह एकूण १ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहाटे चार वाजल्यापासून छापेमारी
तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासूनच कारवाईला सुरुवात केली. पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी प्रशांत रामदास दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.दिपनगर, कुऱ्हा, साकेगाव आणि किन्ही बीट व दूरक्षेत्रांतर्गत विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. कन्हाळा, साकेगाव, पिंप्रीसेकम, फेकरी आणि वराडसीम परिसरातील गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी अचानक धडक दिली. या कारवाईदरम्यान दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील रसायन जागीच नष्ट करण्यात आले.
दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल
या कारवाईत अशोक धनासिंग तायडे (वय ५१, रा. पिंप्रीसेकम), रितेश प्रकाश सूर्यवंशी (वय २८, रा. फेकरी), निवृत्ती दगडू सोनवणे (वय ४५, रा. बेलदारच), विलास गोविंदा सपकाळे (वय ५८, रा. वराडसीम), सागर मधुकर सोनवणे (वय ३०, रा. साकेगाव), भगवान भिमराव कोळी (वय ३८, रा. साकेगाव), केशव माधव मराठे (वय ५०, रा. साकेगाव), उस्मान हसन गवळी (वय ४९, रा. कन्हाळा), खलील हसन गवळी (वय ३९, रा. कन्हाळा) आणि युनूस हसन गवळी (वय ४३, रा. कन्हाळा) यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांच्या या धडक मोहिमेत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे २ हजार ८०० लिटर सडवा रसायन नष्ट करण्यात आले. याशिवाय २७० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण १ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलीस पथकाचा मोहिमेत सहभाग
प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. पोलीस हेडकॉन्स्टेबल वाल्मीक सोनवणे, सुभाष तडवी, विकास बाविस्कर, सुधीर विसपुते, इश्तियाक शेख, पोलीस नाईक हेमंत मिरकली, पोलीस कॉन्स्टेबल रशीद तडवी, सुभाष सोनवणे, सचिन पारधी, न्यायजोद्दीन तडवी, किरण तायडे, जगदीश भोई आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल लीना मधुकर लोखंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.















Discussion about this post