भुसावळ । भुसावळ शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेला पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे ती अनेक वर्षांपासून भुसावळमध्ये राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा क्र. २६५/२६ दाखल करण्यात आला असून इमिग्रेशन आणि परदेशी कायदा, २०२५ अंतर्गत कलम २१, २२ आणि २३ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस तपासात आरोपी महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२) असल्याचे समोर आले. ती बांगलादेशातील पीरोजपुर जिल्ह्यातील रहिवासी असून भारतात आल्यानंतर “जस्मिन बी मोहम्मद खान” या नावाने दीनदयाल नगर, भुसावळ येथे वास्तव्यास होती.प्राथमिक चौकशीत आरोपीने २००९ मध्ये एका दलालाला पैसे देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर ती रेल्वेने भुसावळ येथे पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून Samsung Galaxy मोबाईल जप्त केला. मोबाईलच्या तांत्रिक तपासणीत +880 या बांगलादेशी कंट्री कोड असलेल्या क्रमांकांशी सातत्याने संपर्क, व्हॉट्सअॅप चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल्स झाल्याचे पुरावे मिळाले. तसेच मोबाईलमध्ये आरोपीच्या जन्मदाखल्याची प्रतही आढळून आली.
पुढील चौकशीत आरोपीने मृत बहिणीच्या नावावरील कागदपत्रांचा वापर करून स्वतःचे रेशन कार्ड, Aadhaar कार्ड, मतदान ओळखपत्र, PAN कार्ड, बँक पासबुक आणि भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे ती मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परत आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून देणारे एजंट, दलाल आणि संबंधित व्यक्तींचा शोध सुरू असून पोलिसांकडून विविध स्तरांवर चौकशी सुरू आहे.
दरम्यान, जळगाव पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचाली किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.















Discussion about this post