जळगाव । जिल्ह्यातील निवृत्तिवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला (Digital Life Certificate) सादर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘DLC Campaign 5’ अभियानांतर्गत १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालयात मोफत मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.
या मदत कक्षात निवृत्तिवेतनधारकांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच संबंधित ॲप वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करून ऑनलाइन हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाणार आहे.
३० नोव्हेंबरला विशेष कार्यशाळा
दरम्यान, सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा कोषागार कार्यालयात सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातील अधिकाधिक निवृत्तिवेतनधारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यशाळेला येताना निवृत्तिवेतनधारकांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक आणि पीपीओ क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. या सुविधेचा लाभ घेऊन डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.














Discussion about this post