मुंबई । विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारीची जोरदार तयारी करत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी अखेर शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासह पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू असलेल्या अनिल चौधरी यांनी यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत जळगावमधून अपक्ष उतरण्याची तयारी केली होती. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी संपर्कही सुरू केला होता. निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी अनेकदा संवाद साधल्याचे बोलले जात होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या संदेशानंतर, चौधरी यांनी कोणत्याही उमेदवाराला थेट पाठिंबा न देता माघार घेतली होती.
चौधरी यांच्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या भुसावळ मतदारसंघात आधीपासूनच राजकीय प्रभावासाठी चुरस पाहायला मिळते. सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून भुसावळमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
आता अनिल चौधरी यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे भुसावळ आणि जळगाव जिल्ह्यातील महायुतींतर्गत आणि स्थानिक स्तरावरील समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.















Discussion about this post