मुंबई । ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने सुकू लागलेली पिके आणि चिंतेत सापडलेला बळीराजा यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होणार असून, पुढील २ ते ३ दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागपूरसह पूर्व विदर्भात ३, ४ आणि ५ सप्टेंबरदरम्यान जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पश्चिम विदर्भातही पावसाची दमदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
४ ते ८ सप्टेंबरदरम्यान विदर्भात पाऊस
४ सप्टेंबरपासून ८ सप्टेंबरपर्यंत विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे. कमी दाबाचा पट्टा गुजरातच्या दिशेने सरकत असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्येही पावसाची शक्यता आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यात पुढील २४ तासांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातही मध्यम ते चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात २, ३ आणि ४ सप्टेंबर रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
कोकणातही पावसाचा जोर वाढणार
दरम्यान, कोकण किनारपट्टी भागातही पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पालघरपर्यंतच्या किनारपट्टी भागात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. आज रात्रीपासून राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचेही डख यांनी म्हटले आहे.
पाऊस सर्वदूर मात्र विखुरलेल्या स्वरूपात
राज्यात पुढील चार दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहणार असले तरी पाऊस सर्वत्र एकाच वेळी आणि समान प्रमाणात होणार नाही. काही ठिकाणी जोरदार, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार पावसाचा अंदाज घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत, अशी अपेक्षा आहे.
गणेशोत्सवातही पावसाची शक्यता
विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या कालावधीतही राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या अंदाजामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.














Discussion about this post