अकोला : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अकोट शहरातील शरद पवार गटाचे शहराध्यक्ष संदेश घनबहादूर आणि बारी समाजाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. श्याम नेमाळे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आपल्या सामाजिक आणि राजकीय रणनीतीसाठी ओळखले जातात. विविध समाजघटकांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते. आता बारी समाजाला वंचितच्या चळवळीत अधिक सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जात असल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून येत आहे.
बारी समाजातील प्रमुख चेहरा मानले जाणारे डॉ. श्याम नेमाळे यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. ते बारी समाजाचे प्रदेशाध्यक्ष असून वंचितमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी समाजातील प्रश्नांवर प्रकाश आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोट शहराध्यक्ष संदेश घनबहादूर यांनीही आपल्या असंख्य समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अकोट शहरात आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि गजानन गवई यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला.संदेश घनबहादूर यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही वंचितमध्ये प्रवेश केल्याने अकोटमधील पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात बारी समाजासह ओबीसी आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनीही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. विविध समाजघटकांतील कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याच्या दृष्टीने ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.यावेळी डॉ. श्याम नेमाळे यांच्यासह बारी समाजातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी समाजाच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा केली. त्यामुळे आगामी काळात बारी समाजाच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय महत्त्व
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात झालेला हा पक्षप्रवेश शरद पवार गटासाठी राजकीय धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, बारी समाजासह ओबीसी आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना पक्षात सहभागी करून घेत वंचित बहुजन आघाडीने आपला जनाधार वाढवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.या पक्षप्रवेशाचा अकोटसह अकोला जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या राजकारणावर कितपत परिणाम होतो, हे निवडणुकीच्या काळात स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post