मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील घडामोडींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संदर्भातही मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या गटातील काही खासदार आणि आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असा दावा अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार गटातील तब्बल पाच खासदार 12 डिसेंबरपर्यंत अजित पवार गटात दाखल होऊ शकतात, असा दावा केला. केवळ खासदारच नव्हे तर काही आमदारही पक्षांतर करू शकतात, असेही त्यांनी सूचित केले.
आत्राम यांनी पुढे सांगितले की, शरद पवार गटातील अनेक लोक विकासकामे आणि राजकीय भवितव्य लक्षात घेऊन अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक आहेत. “आम्ही कोणतेही ऑपरेशन करणार नाही, निर्णय ते स्वतः घेतील,” असे म्हणत त्यांनी पक्षात मोठ्या राजकीय हालचालींचे संकेत दिले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडणार का, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
मात्र, धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेला दावा अद्याप संबंधित खासदार किंवा शरद पवार गटाकडून अधिकृतरीत्या पुष्टी झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post