मुंबई | लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून त्यानुसार येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 29 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, 56 जागांपैकी महाराष्ट्रातील सहा जागा आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर निवृत्त होणार आहेत. दोन एप्रिलला त्यांची मुदत संपणार आहे.
आता सहा पैकी तीन जागा भाजपच्या निवडून येऊ शकतात. त्यामुळे या तीन जागांसाठी आठ नावे महाराष्ट्र भाजपने निश्चित केली आहेत. ही यादी दिल्ली पाठवली आहे. तसेच चौथी जागा लढवावी का? यासंदर्भातही चाचपणी सुरु आहे.
भाजपची बैठक, ही नावे निश्चित
महाराष्ट्र भाजपची बैठक दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी झाली. त्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली. त्यात आठ नावे निश्चित करण्यात आली. त्यामध्ये नारायण राणे, विनोद तावडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील, संजय उपाध्याय यांचा समावेश आहे. या आठपैकी तीन जणांची नावे निश्चित होणार आहे. विनोद तावडे यांनी बिहारमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. यामुळे त्यांना राज्यसभेचे बक्षीस दिले जाणार असल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी भाजप श्रेष्ठी करत असल्याची चर्चा आहे.















Discussion about this post