जळगाव । येत्या सणासुदीत होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने काही विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली आहे. यात धुळे-दादर या गाडीच्या कालावधीत ३ महिन्याची तर मनमाड येथून सुटणारी मनमाड-दादर या गाडीच्या कालावधीत दोन महिन्याची वाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे नव्हती. धुळे-चाळीसगाव रेल्वेला दोन मुंबई बोगी लावण्यात येत होत्या. पुढे या दोन्ही बोगी अमृतसर एक्स्प्रेसला जोडण्यात येत होत्या. मात्र लॉकडाऊनच्या काळात ही सेवा बंद झाली होती. तेव्हापासून धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नसल्याने प्रवाशांचे होते… हाल होऊ लागले त्यामुळे खासदार डॉ. भामरे यांनी सतत पाठपुरावा केल्याने रेल्वे प्रशासनाने धुळे-दादर एक्स्प्रेस प्रायोगिक तत्वावर २९ एप्रिल २०२३ पासून सुरू झाली.
ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावते. प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद बघून या रेल्वेला जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ पर्यंत पहिल्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. दरम्यान आता आगामी काळात असलेले सण, उत्सव लक्षात घेऊन रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा धुळे-दादर रेल्वेला २ जानेवारी २४ पर्यंत तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. ०१०६५ दादर- धुळे एक्स्प्रेस सोमवार, शुक्रवार व रविवारी तर ०१०६६ धुळे-दादर ही गाडी सोमवार गुरुवार व शनिवारी धावणार आहे.
दुसरीकडे मनमाड येथून सुटणारी ०२१०२ मनमाड – दादर विशेष गाडीचा कालावधीही दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. ही गाडी ४ ऑक्टोबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत धावणार आहे. तर ०२१०१ दादर – मनमाड विशेष गाडी ४ ऑक्टोबर ते ०१ जानेवारी २०२४ पर्यंत धावेल.















Discussion about this post