मुंबई । सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या साखरेच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या गाळप हंगामात देशातील साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन अर्थात ‘इस्मा’ने २०२६-२७ या हंगामासाठी साखर उत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार देशातील साखर उत्पादनात मागील हंगामाच्या तुलनेत ५ टक्क्यांची घट होऊन उत्पादन २६५ लाख टनांवर येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या उपलब्धतेवर होऊन दरवाढीचा दबाव निर्माण होऊ शकतो.
यंदा देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये हवामानाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. काही राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे, तर काही भागांत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन घटले आहे. महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज आहे.
इस्माच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील साखर उत्पादनात तब्बल १२ टक्क्यांची घट होऊन उत्पादन ८७ लाख टनांपर्यंत खाली येऊ शकते. कर्नाटकातील उत्पादनात ७ टक्के, तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील उत्पादनात प्रत्येकी १ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशातील गाळपासाठी उपलब्ध असलेले ऊस क्षेत्रही यंदा सुमारे ३ टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
देशातील साखरेचे संभाव्य उत्पादन आणि वार्षिक वापर यामध्ये मोठी तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्माच्या अंदाजानुसार, यंदा देशात २६५ लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकते. मात्र, देशाची वार्षिक साखर गरज सुमारे २९० लाख टन आहे. त्यामुळे उत्पादन आणि मागणी यामध्ये सुमारे २५ लाख टनांची तफावत राहण्याचा अंदाज आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी सुमारे २० लाख टन साखर आयात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सप्टेंबर २०२७ अखेर देशातील साखरेचा शिल्लक साठा २० ते २५ लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
इथेनॉल निर्मितीवरील निर्णयाचाही परिणाम
यंदाच्या हंगामात उसाचा रस आणि साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकारने पूर्णपणे बंदी घातल्याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरत आहे. याशिवाय प्रतिकूल हवामानामुळे ऊस उत्पादनात झालेली घट साखर उद्योगासमोर आव्हान निर्माण करत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मे महिन्यात भारताने साखर निर्यातीवर निर्बंध आणत १० लाख टन साखर आयातीला परवानगी दिली होती. मात्र, देशांतर्गत उपलब्धतेबाबत चिंता कायम असल्याने आगामी काळात आयातीचे प्रमाण वाढवण्याची गरज निर्माण होऊ शकते.
साखरेच्या उत्पादनातील घट आणि मागणीतील वाढ यामुळे बाजारात दरवाढीचा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. साखरेच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होणार आहे. चहा, मिठाई, बेकरी उत्पादने तसेच शीतपेयांच्या किमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामात प्रत्यक्ष उत्पादन किती होते आणि केंद्र सरकार साखरेच्या उपलब्धतेसाठी कोणती पावले उचलते, याकडे ग्राहकांसह साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post