जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने आता निर्णायक वळण घेतले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस उजाडला असतानाही महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीला एक जागा देऊन उर्वरित जागांवरील उमेदवारांनी माघार घ्यावी, असा प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पाच बैठका होऊनही चोपडा-मुक्ताईनगरचा तिढा कायम
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने सर्व जागांवर एकत्रित निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, चोपडा आणि मुक्ताईनगर येथील जागांवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमनेसामने आल्याने जागावाटपाचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. या दोन जागांवर एकमत घडवून आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या आतापर्यंत जवळपास पाच बैठका पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीलाही एक जागा देऊन उर्वरित ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्याचा पर्याय पुढे आला आहे. याच अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्नांना वेग आला आहे. काल रात्री उशिरापर्यंत अजिंठा विश्रामगृहात याच विषयावर नेत्यांच्या बैठका आणि चर्चा सुरू होत्या.
गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्या जागाही बिनविरोध होण्याची शक्यता
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या दोन, भाजपची एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक अशा एकूण चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता माघारीच्या अंतिम दिवशी आणखी काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भाजपच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी सूचना केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची जागाही बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. संबंधित कार्यकर्त्याने माघार घेतल्यानंतर महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. माघारीच्या अंतिम दिवसानंतर सहा ते सात जागा बिनविरोध होतील, असा अंदाज मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
सुमित पाटील यांच्या बिनविरोध निवडीकडेही लक्ष
दरम्यान, आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांच्या उमेदवारीचा विषयही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चर्चेचा ठरला आहे. सुरुवातीला छाननी प्रक्रियेत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला होता. या निर्णयानंतर सुमित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे आपला अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच या संपूर्ण प्रकरणामागे असलेली ‘अदृश्य शक्ती’ कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
यानंतर सुमित पाटील यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले. या अपिलावर सुनावणी झाल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला. त्यामुळे निवडणुकीतील त्यांचा सहभाग निश्चित झाला आहे. आता सुमित पाटील यांच्या विरोधातील भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मंत्री गिरीश महाजन यांनीही पत्रकारांशी बोलताना याबाबत संकेत दिले होते. त्यामुळे सुमित पाटील यांची जागा बिनविरोध होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post