भुसावळ । मंगला एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या हातातील लॅपटॉप बॅगा हिसकावून पसार होणाऱ्या टोळीचा भुसावळ रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ८५ हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांनी ही कारवाई केली.
८ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील अब्दुल अजीम शेख (२४) हे आपल्या मित्रासोबत मंगला एक्स्प्रेसने प्रवास करत होते. गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर येताच २० ते २५ वर्षे वयोगटातील चार ते पाच तरुण एस-६ डब्यात शिरले.
गाडी थांबताच टोळीतील दोघांनी प्रवाशांच्या हातातील दोन लॅपटॉप बॅगा जबरदस्तीने हिसकावल्या आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. चोरीला गेलेल्या बॅगांमध्ये ४५ हजार रुपये किमतीचा आसुस कंपनीचा आणि ४० हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप होता. याशिवाय आधारकार्ड, पॅनकार्ड आणि ८ हजार रुपये रोख असा एकूण सुमारे ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
सीसीटीव्हीच्या आधारे तपासाची चक्रे फिरली
घटनेनंतर पीडित प्रवाशाने ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरपीएफ, जीआरपी, सीपीडीएस आणि सीआयबीच्या पथकांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. पोलिसांनी भुसावळ शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांचा माग काढला.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पापा नगर येथील सलमान अब्दुल गफूर (२४) आणि मुस्लिम कॉलनीतील समीर अली शेरू अली (२४) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर चोरीला गेलेले दोन्ही लॅपटॉप पोलिसांच्या हाती लागले.चौकशीत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी पापा नगर येथील शेख दानिश शेख अकील (२०) आणि काझी प्लॉट येथील जाहिद फकीर तडवी (१९) या दोघांनाही ताब्यात घेतले. अशाप्रकारे मंगला एक्स्प्रेसमधील लॅपटॉप चोरीप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपींकडून दोन लॅपटॉप जप्त केले असून, या टोळीने अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास सध्या लोहमार्ग पोलिसांकडून सुरू आहे.














Discussion about this post