महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील तब्बल आठ जिल्हा व सत्र न्यायालयांना सोमवारी एकाच वेळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाले. ठाणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, हिंगोली, परभणी आणि अमरावती या जिल्ह्यांतील न्यायालयांना धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलीस प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या असून, खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयांच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांना धमकीचा ई-मेल मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना न्यायालयाच्या इमारतीतून बाहेर काढण्यात आले. अचानक न्यायालये रिकामी करण्याचे आदेश मिळाल्याने अनेक ठिकाणी धावपळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ठाणे जिल्हा न्यायालयाला धमकीचा ई-मेल मिळताच ठाणे नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सातारा जिल्हा न्यायालयातही बॉम्बने इमारत उडवून देण्याचा इशारा देण्यात आल्याने पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. बीड जिल्हा व सत्र न्यायालयात ई-मेल मिळाल्यानंतर वकील आणि पक्षकारांची बाहेर पडण्यासाठी मोठी धावपळ उडाली. तर सोलापूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत न्यायालय परिसर निर्मनुष्य केला.
हिंगोली जिल्हा न्यायालयात धमकीचा संदेश मिळताच बॉम्बशोधक पथकाने न्यायाधीशांचे चेंबर आणि विविध दालनांची तपासणी सुरू केली. अमरावतीमध्येही पोलिसांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढवत संपूर्ण न्यायालय इमारतीची झाडाझडती घेतली. सांगली आणि परभणी जिल्हा न्यायालयांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाले असून, तेथेही पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तपासणी सुरू केली आहे.
बॉम्बशोधक पथकांकडून कसून तपासणी
या सर्व जिल्ह्यांमध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक आणि स्थानिक पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. न्यायालयांच्या प्रत्येक दालनाची, न्यायाधीशांच्या कक्षाची तसेच परिसरातील संशयास्पद वस्तूंची कसून तपासणी केली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, एकाच वेळी आठ जिल्हा न्यायालयांना धमकीचे ई-मेल पाठवण्यामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलीस तपास करत आहेत. हे ई-मेल कुठून पाठवण्यात आले, त्यामागे कोणती व्यक्ती किंवा टोळी आहे आणि हा केवळ खोडसाळपणा आहे की मोठ्या कटाचा भाग, या सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे. एकाच वेळी राज्यातील आठ न्यायालयांना धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.















Discussion about this post