नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून इंडिया आघाडीने केंद्र सरकारविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
महारॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचा आरोप केला. “लोकांच्या यंत्रणा हायजॅक करण्यात आल्या आहेत. मात्र आम्ही देशातील लोकशाही संपवू देणार नाही आणि संविधानालाही धक्का लागू देणार नाही. मतचोरी ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हटवावेच लागेल,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. “ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेच नसते. देशातील १५ टक्के मतदारांना मतदान यादीतून वगळण्यात आले. २०२४ ची निवडणूक बेकायदेशीर होती,” असा आरोप त्यांनी केला. तसेच २०२४ नंतर साडेतेरा कोटी मतदारांची नावे मतदान यादीतून काढून टाकण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर दुजाभावाचा आरोप केला. मोठ्या उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले जाते; मात्र शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर त्याला तुरुंगात टाकले जाते, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराही दिला. “ही महारॅली देशातील जनतेचा आवाज आहे. आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होईल. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आमचा मोर्चा नरेंद्र मोदींकडे वळणार आहे,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून इंडिया आघाडीने पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन केले असून, राहुल गांधी यांच्या आक्रमक भाषणामुळे देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.














Discussion about this post