नंदुरबार । विधान परिषदेच्या निवडणुकीतील निकालानंतर भाजप आणि शिंदेसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले असून, महायुतीतील अंतर्गत वाद आता वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी दिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमात बोलताना हिना गावित यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुका भाजप स्वबळावर लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केले. सध्या तरी कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, असे गृहीत धरावे, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर युती करायची की स्वबळावर लढायचे, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला पाचपैकी केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला. या निकालानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिंदेसेनेवर टीका केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील राजकीय वातावरण अधिक तापले.
या वादावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली. भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणताही वाद किंवा धुसफूस नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नवनाथ बन यांनी टीका करताना पातळी सांभाळावी, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता आहे का, असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आमच्यावर येऊ शकते, असेही शिरसाट म्हणाले.
याचदरम्यान, संजय शिरसाट यांनी आगामी तीन ते चार महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले आहे.
एकूणच विधान परिषदेच्या निकालानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. त्यातच भाजपच्या हिना गावित यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना युती कायम राहणार की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post