मुंबई/जळगाव “| राज्यातील बहुतांश भागांत उन्हाचा कडाका आणि उकाडा कायम असतानाच हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे, उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातही सध्या उन्हाचा तडाखा कायम असून, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये तापमानासोबत आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. दमट वातावरणामुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिण कोकण आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत शुक्रवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, राज्याच्या इतर भागांत ढगाळ वातावरणासोबत उष्णतेचा त्रास कायम राहण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात उकाडा कायम राहण्याची शक्यता
जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तापमानात चढ-उतार दिसून येत असले, तरी दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. पावसासाठी अनुकूल परिस्थिती राज्यातील काही भागांत निर्माण झाली असली, तरी जळगाव जिल्ह्यात पावसाचा ठोस अंदाज नसल्याने नागरिकांना उकाड्यापासून तातडीचा दिलासा मिळण्याची शक्यता स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे जळगावकरांना सध्या उन्हाचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, शुक्रवारपासून राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. जळगाव मध्ये ३१.५ अंश तापमान होते. त्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता असली, तरी उष्णतेपासून पूर्ण दिलासा मिळण्यासाठी नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.















Discussion about this post