जामनेर । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. योगेश भावालाल पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या अपघातानंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भागदरा शिवारात शेतकरी दिनेश महाजन यांच्या शेतात मका काढण्याचे काम सुरू होते. योगेश पाटील हे केवळ स्वतःची शेतीच करत नव्हे, तर मका काढण्याचे मशीन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. दरम्यान, मशीनवर काम करत असताना अचानक योगेश हे मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
तिघा मुलांचे छत्र हरपले
अचानक घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे योगेश पाटील यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या निधनामुळे तीन लहान मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले असून, संपूर्ण गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.या प्रकरणी जामनेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post