जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो पोलिसांचे महामंडळाला पत्र

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी जंतरमंतरसह अन्य ठिकाणी प्रस्तावित आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दिल्ली मेट्रोच्या ५७ स्थानकांवरील प्रवेश व निर्गमन द्वारे बंद ठेवण्याबाबत दिल्ली मेट्रो पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून ही उपाययोजना लागू करण्याची विनंती करण्यात आली असून, १० ऑक्टोबर रोजी परिस्थिती सामान्य होईपर्यंत ती सुरू ठेवण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागाचे संयुक्त पोलीस आयुक्त राजीव गुप्ता यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास कुमार यांना ८ ऑक्टोबर रोजी पत्र पाठविले आहे. जंतरमंतर आणि दिल्लीतील इतर ठिकाणी होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनांमुळे संवेदनशील ठिकाणांकडे मोठ्या जमावाची हालचाल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे काही मेट्रो स्थानकांवरील रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांची वारंवारता कमी करण्यासह प्रवेश आणि निर्गमन द्वारे बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.

या स्थानकांचा समावेश
पत्रात जनपथ, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, नवी दिल्ली, सेवा तीर्थ, मंडी हाऊस, बाराखंबा रोड, आयटीओ, दिल्ली गेट, खान मार्केट, आर. के. आश्रम मार्ग, झांडेवालान, सर्वोच्च न्यायालय, इंद्रप्रस्थ, शिवाजी स्टेडियम, आयएनए, हौज खास, जोरबाग, अरजंगड, सराय काले खाँ-निजामुद्दीन, लाजपत नगर, जंगपुरा, आश्रम, कालिंदी कुंज, जसोला, जामिया मिलिया इस्लामिया, ओखला विहार, चावडी बाजार, जामा मशीद, करोल बाग, राजेंद्र प्लेस, विश्वविद्यालय, विधान सभा, सिव्हिल लाइन्स, काश्मिरी गेट, इंद्रलोक, जी. टी. बी. नगर, कन्हैया नगर, नेताजी सुभाष पॅलेस, आझादपूर, आदर्श नगर, जहांगीरपुरी, हैदरपूर बादली मोर, मजलिस पार्क, शालीमार बाग, सीलमपूर, मौजपूर, जाफराबाद, वेलकम, यमुना विहार, खजुरी खास, शाहदरा, रिठाला, रोहिणी ईस्ट आणि रोहिणी वेस्ट या ५७ स्थानकांचा समावेश आहे.
दिल्ली मेट्रो महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देऊन योग्य ती खबरदारी घेण्याची विनंती पोलिसांनी केली आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत या उपाययोजना कायम ठेवण्याचे पत्रात नमूद आहे.
दरम्यान, प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित मेट्रो स्थानकांची सद्यस्थिती आणि दिल्ली मेट्रोकडून जारी होणाऱ्या अधिकृत सूचनांची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.














Discussion about this post