जळगाव । जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत जप्त करण्यात आलेला तब्बल ६५ कोटी ७० लाख रुपये किमतीच्या अंमली पदार्थांचा नियमानुसार पुणे येथे नाश करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस दलाने ही मोठी कायदेशीर कारवाई पूर्ण केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये ‘अॅम्फेटामाइन’ आणि ‘मेथाक्वालोन’ हे प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या जप्त केलेल्या मुद्द्यामालाचे एकूण वजन अवघे ४६.१५४ ग्रॅम एवढे होते, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे किंमत ६५ कोटी ७० लाख रुपये इतकी प्रचंड आहे. हा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे फौजदारी अपीलमधील निर्देश, केंद्र सरकारचे आदेश तसेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी जळगाव येथील केंद्रीय अंमली पदार्थ मुद्देमाल कक्षातील साहित्याचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. समितीच्या मान्यतेनंतर ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या स्ट्राँग रूममधून पंचांसमक्ष आणि वजने-मापे निरीक्षक गौतम उत्तम बावस्कर यांच्या उपस्थितीत हा सीलबंद मुद्देमाल बाहेर काढण्यात आला.
मुद्देमालाची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी जळगाव पोलीस मुख्यालयातील सशस्त्र पोलीस गार्डचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर हा साठा थेट पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील ‘एम/एस महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’च्या प्रांगणात नेण्यात आला.
तेथे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या देखरेखीखाली या अंमली पदार्थांचा नियमानुसार नाश करण्यात आला. या संपूर्ण कारवाईमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात आले आहे. या समितीमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि वजने-मापे निरीक्षक गौतम उत्तम बावस्कर यांचा समावेश होता. जळगाव पोलीस दलाच्या या कठोर कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.














Discussion about this post