बाली येथील जागतिक साहित्य संमेलनात होणार सन्मान
छत्रपती संभाजीनगर : विख्यात कवी, समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार डी. बी. जगत्पुरिया यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा मानाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. इंडोनेशियातील बाली येथे १९ व २० नोव्हेंबर रोजी आयोजित जागतिक साहित्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, याच संमेलनासाठी जगत्पुरिया यांना मुख्य अतिथी म्हणूनही निमंत्रित करण्यात आले आहे.

या दुहेरी सन्मानामुळे साहित्य, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून डी. बी. जगत्पुरिया यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा सन्मान त्यांनी अत्यंत नम्रपणे आप्तस्वकीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांना अर्पण केला आहे.

डी. बी. जगत्पुरिया यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान प्रदीर्घ आणि उल्लेखनीय आहे. त्यांच्या नावावर मराठी व हिंदी कवितासंग्रहांसह पाच समीक्षा ग्रंथ, सामाजिक-वैचारिक लेखन, व्यक्तिचित्रे, नाटक आणि एकांकिका अशा विविध साहित्यप्रकारांतील सुमारे ३० ते ३२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी ३५वे अस्मितादर्श साहित्य संमेलन, अंकुर साहित्य संमेलन यांसह विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
कथा, कविता आणि सामाजिक लेखन करणाऱ्या ७० हून अधिक लेखकांच्या पुस्तकांना त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत. साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेत त्यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांसह सात राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी पत्राद्वारे जगत्पुरिया यांचे विशेष अभिनंदन केले आहे. याबाबतची माहिती डॉ. विनोद सिनकर, कवी रत्नकुमार गोरे, पत्रकार रमेश दाणे आणि कवी जगदीश देवपूरकर यांनी दिली.
डी. बी. जगत्पुरिया यांना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक योगदानाची दखल घेणारा असून, त्यांच्या कार्याचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.















Discussion about this post