राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाअभावी अनेक भागांमध्ये पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला आहे.

दुष्काळ निवारणाच्या कामाला गती देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्षेत्रात उपलब्ध राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी दुष्काळी परिस्थिती हाताळणाऱ्या महसूल, कृषी, पाणीपुरवठा, वीज, पशुसंवर्धन आणि जलसंपदेसह ११ विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

बावनकुळे यांचा दुष्काळग्रस्त भागांचा दौरा
दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. शनिवारी त्यांनी अकोला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची स्थिती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात बावनकुळे यांनी नागरिक आणि शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली. त्यांच्या समस्या समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
पंचनामे आणि मदतीच्या प्रक्रियेला वेग
दुष्काळग्रस्त भागातील पीक नुकसानीचे अचूक पंचनामे करण्यावर सरकारचा भर आहे. पंचनामे आणि परिस्थितीचा अहवाल मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मदतीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे बावनकुळे यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. विमा आणि एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
दरम्यान, दुष्काळाच्या काळात प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात आणि प्रत्यक्ष क्षेत्रात उपलब्ध राहून शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, यासाठी सरकारकडून प्रशासकीय यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे.














Discussion about this post