मुंबई । गांधींचे विचार संपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही, असे म्हणत अभिजीत दीपके यांनी शिवाजी पार्कातील सभेतून संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. “जोपर्यंत या देशात आम्ही आहोत, तोपर्यंत गांधी जिवंत आहेत,” असे वक्तव्य त्यांनी केले.

सीजेपीच्या वतीने शिवाजी पार्क येथे ‘ग्यानू, मस्ट गो…’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत दीपके यांनी गांधी, नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “गांधींना गोळी मारून संपवू असे संघींना वाटले होते; पण गांधी मरत नसतात. इथे जमलेला प्रत्येकजण गांधी आहे. गोडसे येतील आणि जातील, गोडसे भ्याड आहेत. हा देश गांधींच्या विचारांवर टिकून आहे,” असे दीपके म्हणाले.

गांधी, आंबेडकर आणि नेहरूंचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दीपके यांनी गांधी, नेहरू आणि डॉ. आंबेडकर यांच्याशी तुलना करण्यावरूनही भाष्य केले. “गांधी देशाचा आत्मा, आंबेडकर देशाचा कणा तर नेहरू देशाचे ज्ञान आहेत. त्यांची बरोबरी करण्याची तुमची औकात नाही,” असा दावा त्यांनी केला.
निवडणुका जिंकणे हेच काही जणांचे एकमेव उद्दिष्ट असल्याचा आरोप करत त्यांनी महापुरुषांच्या कार्याचा दाखला दिला. देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार आणि लोकशाही व्यवस्थेची जाणीव निर्माण करण्यात नेहरू आणि आंबेडकरांचे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘चहा विकायला कुणी सांगितलं होतं?’
यावेळी दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहा विकून इथपर्यंत आलो’ या विधानावरही टीका केली. “तुम्हाला आम्ही चहा विकायला सांगितलं होतं का? शाळेत जायचं होतं ना? शिकायचं होतं, नोकरी करायची होती,” असे ते म्हणाले. मोदी यांच्या ‘गरीब आईचा मुलगा’ या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. देशातील वाढत्या गरिबीला सरकारची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच देशाच्या विकासासाठी योग्य धोरणांचा अभाव असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या परदेश दौऱ्यांवरही निशाणा साधला. दरम्यान, दीपके यांच्या या वक्तव्यांमुळे शिवाजी पार्कातील सभेत राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.















Discussion about this post