पुणे । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदावर कार्यरत असलेले महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव त्यांची सचिवपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.

MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून आयोगाच्या कामकाजाबाबत आंदोलन सुरू होते. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पुण्यात २ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.या चर्चेदरम्यान MPSC सचिवांच्या बदलीबाबत विद्यार्थ्यांना आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर आता सरकारने प्रत्यक्ष शासन निर्णय काढत हरपाळकर यांची सचिवपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे.

शासन निर्णयात काय म्हटले?
महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव त्यांची ही प्रतिनियुक्ती आता समाप्त करण्यात आली आहे.हरपाळकर यांना पुढील पदस्थापना कुठे देण्यात येणार, याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांनी MPSC सचिवपदाचा कार्यभार आयोगाच्या अध्यक्षांच्या संमतीने अन्य अधिकाऱ्याकडे तातडीने सोपवावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अध्यक्षांच्या राजीनाम्याचाही समावेश
MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कामकाजाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते. आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून आश्वासन देण्यात आले नाही. त्याऐवजी सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. आता त्यानुसार शासन निर्णय जारी झाल्याने या मागणीवर कार्यवाही झाली आहे.दरम्यान, हरपाळकर यांच्या जागी सचिवपदाची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याकडे सोपवली जाते, याकडे MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post