मुंबई । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आगामी १ ऑक्टोबरपासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट घेण्यासाठी ‘एनसीएमसी’ (NCMC – नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) चा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे एसटीच्या सवलतीच्या तिकीट व्यवस्थेत डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर वाढणार आहे.

डिजिटल प्रणालीचा उद्देश आणि सुविधा
एसटी महामंडळाकडून शासनाच्या निर्देशानुसार विविध समाज घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. ही सवलत अधिक सुलभ व्हावी आणि डिजिटल व्यवस्थापन मजबूत व्हावे, यासाठी ही NCMC कार्ड प्रणाली लागू केली जात आहे.

NCMC कार्ड नसल्यास काय करायचे?
१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट मुख्यत्वे NCMC कार्डच्या माध्यमातूनच दिले जाईल. मात्र, ज्या प्रवाशांकडे सध्या Active NCMC कार्ड नाही, त्यांच्यासाठी एक पर्यायी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे:
ज्या प्रवाशांनी कार्डसाठी नोंदणी केली आहे आणि त्यांच्याकडे QR कोड असलेली पावती आहे, ते ही पावती वाहकाच्या ETM मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेऊ शकतात. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत वैध राहील. या कालावधीत प्रवाशांनी आपले NCMC कार्ड ॲक्टिव्ह करून त्यात टॉप-अप (Top-up) करणे बंधनकारक असेल.
कार्ड नोंदणी आणि टॉप-अप कुठे होणार?
NCMC कार्डची नोंदणी आणि वितरण एसटी बसस्थानके, आगार तसेच अधिकृत केंद्रांवर सुरू आहे. यासाठी ‘ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ची अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्डमध्ये पैसे भरण्यासाठी भीम ॲपचा (BHIM App) वापर करता येणार असून, कार्डावरील QR कोड स्कॅन करून सोप्या पद्धतीने टॉप-अप करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
बायोमेट्रिक प्रक्रियेत बोटांचे ठसे न उमटल्यास, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTP (वन टाईम पासवर्ड) च्या माध्यमातून NCMC कार्ड नोंदणी करण्याची पर्यायी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.















Discussion about this post