मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांचे आरोप समोर आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या तीव्र राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, विरोधकांनी आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विविध राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. निवडणूक प्रक्रियेवरील पारदर्शकता आणि विश्वासाचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे यांनी ‘एसआयआर’ (SIR) ची संपूर्ण प्रक्रिया त्वरित रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे. राज ठाकरेंनी सर्व विरोधकांनाही महत्त्वाचं आवाहन केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला विरोधक प्रतिसाद देतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी
राज ठाकरे म्हणाले, ‘ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो , गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे’.
‘एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा. तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे. तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल, असे ते पुढे म्हणाले.















Discussion about this post