रावेर । रावेरच्या निंभोरा पोलिसांनी एकाच घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासातून तब्बल तीन घरफोडींच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच सराईत आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोकड हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काय होती घटना?

खिर्डी येथील रहिवासी शेहनाज शेख अख्तर या १३ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ३२ हजार ८१० रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पोलिसांची वेगाने चक्रे फिरली:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निंभोरा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांना सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू केला.
असे जाळ्यात अडकले आरोपी:
तपासादरम्यान पोलिसांनी नवाज शेख शरीफ (वय २३, रा. खिर्डी खुर्द) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आणि आपल्या साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंबई येथून शहादत बेग रफिक बेग (वय २२) याला अटक केली, तर अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख रमजान (वय ३२) आणि शाकीब बेग साबीर बेग (वय ३२) यांना खिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. पहिल्या गुन्ह्यातून ५ लाख ७९ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दोन नवीन गुन्हे उजेडात:
अटकेतील आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी खिर्डी गावातच आणखी दोन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांमध्ये चेतन लिलाधर जाधव (वय २९, रा. खिर्डी खुर्द) हा पाचवा आरोपी निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली. या दोन घरफोड्यांमधील चोरीस गेलेला १ लाख ७७ हजार ४०० रुपयांपैकी ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल (सोन्याच्या बाळ्या, चांदीच्या लक्ष्मी, शारदा, बालगोपाळ व गणेशाच्या मूर्ती) जप्त करण्यात आला.
पोलीस पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून तिन्ही घरफोडी प्रकरणातील एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या सराईत चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून, निंभोरा पोलीस पुढील तपास करत आहेत.














Discussion about this post