मुंबई । महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची कमतरता आणि पिकांच्या नुकसानीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे थेट दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. २८ सप्टेंबरपासून शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांतील प्रभावित भागांना भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्य सरकारकडून दुष्काळी परिस्थितीच्या आकलनासाठी आणि संभाव्य मदत उपाययोजनांसाठी प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील २० जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांमध्ये पावसाचा खंड ३० दिवसांपेक्षा अधिक राहिल्याची माहितीही समोर आली आहे.

२८ सप्टेंबरपासून होणाऱ्या दौऱ्यात शरद पवार दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पिकांची स्थिती, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा ते आढावा घेणार आहेत. या पाहणीनंतर शरद पवार सरकारसमोर कोणत्या मागण्या मांडतात, याकडे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याची ठाम मागणी केली होती. तसेच, शेतकरी संकटात सापडला असून त्याला तातडीने दिलासा देण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात यावी, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती. आता पत्रापलीकडे जात शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
रोहित पवारांचाही दौरा सुरू
एका बाजूला शरद पवार स्वतः २८ सप्टेंबरपासून पाहणी दौरा करणार आहेत, तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार रविवारपासूनच राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकेची तोफ डागली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून, ते सरकारकडे काय मागण्या करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post