जामनेर : डिजिटल अरेस्ट आणि सीबीआयकडून अटकेची भीती दाखवत भामट्यांनी जामनेर येथील स्टेट बँकेचे निवृत्त कॅशियर माणिक मारुती घुले (७२, रा. शिवशक्तीनगर, जामनेर) यांना तब्बल २३ लाख ४० हजार ७० रुपयांचा गंडा घातला. पोलिसांची खाकी वर्दी परिधान करून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे चौकशीचा बनाव करत भामट्यांनी वर्षभर घुले यांना धमकावले. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माणिक घुले हे २०१४ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जामनेर शाखेतून कॅशियर पदावरून निवृत्त झाले आहेत. १० ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांना दीपक शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःची ओळख दिल्ली पोलिस अधिकारी म्हणून करून दिली. घुले यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून सदाकत खान नावाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराने सिमकार्ड आणि कॅनरा बँकेत खाते उघडल्याचा दावा त्याने केला.

या खात्यातून तब्बल तीन कोटी रुपयांची मानवी तस्करी आणि मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगत, या प्रकरणात घुले यांनाही अटक होईल, अशी भीती घातली. घाबरलेल्या घुले यांनी १३ ऑक्टोबर रोजी इंडसइंड बँकेच्या खात्यात ३ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले.
यानंतर भामट्यांनी पुन्हा १२ लाख रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगताच ‘जेलमध्ये टाकू’ अशी धमकी देण्यात आली. अटकेच्या भीतीने घुले यांनी एसबीआयकडून ७ लाख ५० हजार रुपयांचे गोल्ड लोन घेतले. तसेच ओव्हरड्राफ्ट क्लोज केल्यानंतर मिळालेले ३ लाख ५० हजार रुपये असे एकूण ११ लाख रुपये १५ ऑक्टोबर रोजी भामट्यांच्या खात्यात पाठवले.
खाकी वर्दीतील भामट्यांचा व्हिडिओ कॉल
यानंतर आरोपींनी पोलिसांची खाकी वर्दी परिधान करून घुले यांना व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला. हे प्रकरण सीबीआय अधिकारी कीर्ती सन्याल यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कीर्ती सन्याल नावाच्या महिलेने व्हिडिओ कॉल करून घुले यांच्याविरोधात दिल्ली हायकोर्टात केस सुरू असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या नावाने वॉरंट निघणार असून सर्व मालमत्ता सील करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. अटकेच्या भीतीने घाबरलेल्या घुले यांनी आपल्या खात्यात ३ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर भामट्यांनी ही रक्कमही उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारातून घुले यांच्याकडून एकूण २३ लाख ४० हजार ७० रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.















Discussion about this post