मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कारवाई केली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर निर्धारित कालावधीपेक्षा अधिक काळ राहिल्याच्या प्रकरणात त्यांना संचालकपदावरून अपात्र ठरवण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, बाबासाहेब पाटील यांच्यासह बँकेतील आणखी सात संचालकांवरही ही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.

१० वर्षांच्या कार्यकाळाचा नियम

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बाबासाहेब पाटील हे दीर्घकाळ संचालक म्हणून कार्यरत होते. सहकारी बँकांच्या संचालकांच्या कार्यकाळाबाबत Banking Laws (Amendment) Act, 2025 अंतर्गत महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालकांना वगळता इतर संचालकांचा सलग कमाल कार्यकाळ ८ वर्षांवरून १० वर्षे करण्यात आला आहे. ही तरतूद १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाली.
RBIच्या स्पष्टीकरणानुसार, १ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यानंतर सलग १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या सहकारी बँकेच्या संचालकाला पदावर कायम राहता येणार नाही. महाराष्ट्र सरकारनेही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये या तरतुदीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते.
आठ संचालकांविरोधात तक्रार
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आठ संचालकांनी निर्धारित १० वर्षांच्या कालावधीपेक्षा अधिक काळ पदावर राहिल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऑगस्ट २०२६ मध्ये RBIला संबंधित तक्रारीवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर RBIकडून कारवाई करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या कारवाईमुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.
बाबासाहेब पाटील काय म्हणाले?
दरम्यान, RBIच्या निर्णयावर बाबासाहेब पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. २०२१ मध्ये संचालकांच्या १० वर्षांच्या कार्यकाळाबाबत कायदा करण्यात आला असून तो आपल्याला लागू होतो, त्यामुळे बडतर्फीचा निर्णय योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.या प्रकरणाचा पुढील कायदेशीर प्रवास आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालक मंडळाबाबत होणाऱ्या घडामोडींकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post