मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २० दिवसांपासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी उपोषणाची सांगता केली असून, सरकारला मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांनी उपोषण सोडल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. “मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, याचा मला आनंद आहे. आम्ही त्यांना आवाहन केलं होतं. त्यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत. एका मागणीसमोर कायदेशीर अडचण असल्याने ती मान्य करता आली नाही. याबाबत त्यांना सांगण्यात आलं आहे,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

सरकारच्या उपसमितीने जरांगे पाटील यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आवश्यक बैठका आणि प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. संबंधित मागण्यांवर सरकार सकारात्मक असून, संवादासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, जरांगे पाटील यांनी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. या काळात मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
‘मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे कोणी घेतले नाहीत’
“मराठा समाजासाठी जे काही मिळालं, ते आमच्या काळात मिळालं आहे. मराठा समाजासाठी जेवढे निर्णय आम्ही घेतले, तेवढे निर्णय कोणी घेतले नाहीत,” असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.जरांगे पाटील यांचे उपोषण संपल्याबद्दल त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले. या सर्वांनी चर्चेच्या प्रक्रियेत मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सेवा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिनाभर विविध ठिकाणी सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.“महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आगेकूच सुरू असून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे फडणवीस म्हणाले. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध सेवा आणि उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post