मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल २० दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची अखेर मध्यरात्री सांगता केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आता उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून ते सहकाऱ्यांसह संभाजीनगरकडे निघाले आहेत.

जरांगे पाटील यांचा कालचा मुक्काम पाटोदा येथे होता. उपोषणाची सांगता झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान, जरांगे संभाजीनगरकडे रवाना झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले. तेही जरांगे पाटील यांच्यासोबत संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.
प्रकृती खालावल्याने आंदोलनस्थळीच वैद्यकीय उपचार
गेल्या काही दिवसांपासून उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत होती. काल त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने आंदोलनस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना प्रवास टाळून तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. वैद्यकीय तपासणीत त्यांना अतिसाराचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले. तसेच लघवीच्या अहवालात किटोन आढळून आल्याची माहिती देण्यात आली. दीर्घकाळ अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती.
जरांगे यांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी यावर आंदोलनस्थळीच डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत होते. प्रकृती आणखी खालावू नये यासाठी ICU मॉनिटरचीही व्यवस्था करण्यात आली होती.
चार ते पाच दिवस रुग्णालयात उपचाराची शक्यता
जरांगे पाटील यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या अंदाजानुसार त्यांना किमान चार ते पाच दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागू शकतात. त्यानंतरही काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, २० दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलनाची सांगता केल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post