राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परळी येथे नागरिकांच्या समस्या ऐकून घेत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर उपस्थितांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट केले आहे.


परळी येथील शासकीय विशेष विश्रामगृहात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत नियमित जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांच्या तक्रारी आणि विविध समस्या ते जाणून घेत होते. याचदरम्यान त्यांना अचानक शारीरिक त्रास जाणवू लागला. परिस्थिती लक्षात घेऊन उपस्थितांनी त्यांना तातडीने विश्रामगृहाजवळील रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
डॉक्टरांकडून प्रकृती स्थिर असल्याची माहिती
प्राथमिक उपचारानंतर धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ती नियंत्रणात आहे. डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून असून आवश्यक उपचार सुरू आहेत. दरम्यान, सततची धावपळ आणि ताणतणावामुळे त्यांना हा त्रास झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांनी त्यांना काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येताच परळी तसेच राज्यभरातील त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट केल्यानंतर समर्थकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आवश्यक वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर आणि डॉक्टरांची परवानगी मिळाल्यावर धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.















Discussion about this post