मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, आगामी मुंबई आंदोलनाची घोषणा केली. १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.


जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे होणाऱ्या या प्रवासात विविध ठिकाणी मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा, १६ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, १७ सप्टेंबर रोजी पुण्यातील हडपसर, तर १८ सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.
यानंतर १९ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
गिरीश महाजन म्हणाले, ‘ही वेळ योग्य नाही’
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचे बोलणे सुरू आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे महाजन यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे सांगत महाजन यांनी जरांगे पाटील यांनी आंदोलनाची वेळ टाळावी, असे आवाहन केले. “गणेशोत्सव हा आपला सर्वात मोठा उत्सव आहे. या काळात मुंबईमध्ये मोठी गर्दी होते. महिला, मुले रस्त्यावर असतात. मला वाटते, ही वेळ त्यांनी टाळली पाहिजे,” असे महाजन म्हणाले. पुढे ते म्हणाले की, आंदोलन करणे, उपोषण करणे किंवा मोर्चा काढणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, “ही वेळ काही योग्य नाही. त्यांनी अजूनही विचार करावा,” असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले.
हायकोर्टाच्या भूमिकेमुळे आंदोलनाबाबत उत्सुकता
दरम्यान, मुंबईतील आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी घ्यावी लागेल, अशी भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सरकारकडून जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी मिळणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे सरकारकडून चर्चा आणि मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे जरांगे पाटील आपल्या मुंबई आंदोलनावर ठाम आहेत.
त्यामुळे आगामी काळात सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चा कोणत्या दिशेने जाते आणि १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post