नवी दिल्ली : घरगुती LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी रिफिल बुकिंगचा नियम आता समान करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना यापुढे सिलिंडरच्या पुढील रिफिलसाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. आता सर्व घरगुती LPG ग्राहकांना मागील सिलिंडरची डिलिव्हरी झाल्यानंतर २५ दिवसांनी पुढील सिलिंडर बुक करता येणार आहे.
यापूर्वी शहरी भागातील ग्राहकांसाठी रिफिल बुकिंगची मर्यादा २५ दिवसांची होती. मात्र, ग्रामीण भागातील ग्राहकांना पुढील सिलिंडर बुक करण्यासाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. LPG पुरवठ्यावर दबाव निर्माण झाल्यानंतर ग्रामीण आणि शहरी ग्राहकांसाठी वेगवेगळे नियम लागू करण्यात आले होते.

मात्र, आता LPG पुरवठा व्यवस्थेत सुधारणा झाल्याने केंद्र सरकारने ग्रामीण भागातील ४५ दिवसांची मर्यादा हटवून ती २५ दिवसांवर आणली आहे. त्यामुळे देशभरातील घरगुती LPG ग्राहकांसाठी बुकिंगचा कालावधी समान झाला आहे.
ग्रामीण ग्राहकांना मोठा दिलासा
नव्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील LPG ग्राहकांना होणार आहे. आधीच्या नियमांनुसार त्यांना ४५ दिवस पूर्ण होईपर्यंत नवीन रिफिल बुक करता येत नव्हते. आता ही मुदत थेट २५ दिवसांवर आल्याने ग्रामीण ग्राहकांना तब्बल २० दिवस आधी पुढील सिलिंडर बुक करता येणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी ७ सप्टेंबर रोजी या बदलाची माहिती दिली. त्यानंतर पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील प्रमुख तेल विपणन कंपन्यांना नव्या नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

देशभरात एकच नियम
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या तेल कंपन्यांना या बदलाची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार LPG पुरवठ्याची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत सुधारली असून रिफिलचा प्रलंबित साठाही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बुकिंगची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यापुढे शहरी असो किंवा ग्रामीण, सर्व घरगुती LPG ग्राहकांना मागील रिफिलच्या डिलिव्हरीनंतर २५ दिवसांनी पुढील सिलिंडर बुक करता येणार आहे. त्यामुळे LPG बुकिंगच्या नियमांमधील शहरी-ग्रामीण भेद आता संपुष्टात आला आहे.















Discussion about this post