जामनेर । शेतजमिनीच्या मोजणीनंतर मिळणाऱ्या स्कीम पत्रक आणि टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी अवघ्या २०० रुपयांची लाच स्वीकारताना जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहाथ पकडले. भगवान रोहिदास गायकवाड (वय ५१) असे लाचखोर लोकसेवकाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदाराने जामनेर तालुक्यातील आपल्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी २ सप्टेंबर २०२६ रोजी भूमी अभिलेख कार्यालयात अधिकृत अर्ज केला होता. जमिनीची मोजणी झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे (स्कीम पत्रक व टिपण उतारा) यांच्या सत्यप्रती मिळवण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र, या प्रती देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी भगवान गायकवाड यांनी ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
शासकीय कामासाठी बेकायदेशीर लाच मागितल्याने तक्रारदाराने याबाबत ७ सप्टेंबर रोजी जळगाव एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने ८ सप्टेंबर रोजी जामनेर भूमी अभिलेख कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान गायकवाड यांनी तडजोड करत २०० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. लाचेची मागणी सिद्ध होताच एसीबीच्या पथकाने कार्यालयातच सापळा रचला. तक्रारदाराकडून २०० रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने गायकवाड यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.

याप्रकरणी आरोपी भगवान गायकवाड यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कारवाई करणारे पथक:
ही यशस्वी कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण ठाकूर आणि सचिन चाटे यांनी केली.















Discussion about this post