पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात आज हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. पेपरफुटीच्या घटना, परीक्षा आणि निकालांना होणारा विलंब, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव तसेच महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात सुमारे पाच हजार विद्यार्थी एकत्र जमले आहेत. येथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने विद्यार्थ्यांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. MPSCच्या परीक्षा प्रक्रियेत वारंवार निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप असल्याचे या आंदोलनातून दिसून आले.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी हातात घेतलेल्या उपहासात्मक आणि बोचऱ्या पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पोस्टर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी MPSCच्या कार्यपद्धतीवर थेट सवाल उपस्थित केले आहेत.पेपरफुटी, परीक्षा वेळापत्रकातील गोंधळ, निकालाला होणारा विलंब आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांनी पोस्टर्समधून उपरोधिक भाष्य केले. ‘परीक्षा कधी होणार? निकाल कधी लागणार?’ अशा प्रश्नांसह विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश
MPSCच्या परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, पेपरफुटीसारख्या प्रकारांना आळा घालावा, परीक्षा व निकाल वेळेत जाहीर करावेत, तसेच आयोगातील महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांबाबत स्पष्टता असावी, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत. दरम्यान, हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या या आक्रोश मोर्चामुळे पुण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.















Discussion about this post