जळगाव । जळगावात पार पडलेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत एक रंजक घटना घडली आहे. बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन दाखल होताच, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी तिथून काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत वादाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. मात्र, या सर्व प्रकरणावर आता खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?
रक्षा खडसे बैठकीतून निघून गेल्यावर निर्माण झालेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना गिरीश महाजन म्हणाले की, “रक्षा खडसे यांची उद्या दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक आहे. त्यांना या बैठकीसाठी दिल्लीला जायचे असून त्यांचे विमान संध्याकाळी सात वाजता होते; त्यामुळे त्या मीटिंगमधून एक तास आधीच बाहेर पडल्या. त्यांनी मला याबद्दल आधीच माहिती दिली होती.” तसेच पक्षात कोणताही अंतर्गत वाद नसल्याचे स्पष्ट करत, त्यांच्या घरगुती किंवा वैयक्तिक विषयाशी याचा संबंध असेल, तर तो वेगळा विषय आहे, असेही महाजन यांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील सर्व बडे नेते उपस्थित होते. परंतु निमंत्रण असून देखील भाजप नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, एकही भाजप नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता, त्यामुळे मंत्री रक्षा खडसे या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.















Discussion about this post