बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या पदांवर नियमित स्वरूपात नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया २९ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.
शिक्षण पात्रता किती असावी?
ट्रेड फायनान्स ऑफिसर (IBG) JMGS-I पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे किंवा IIBF कडून फॉरेक्स ऑपरेशन्स प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र ३१ जुलै, २०२६ रोजी किंवा त्यापूर्वीचे असावे. त्यांच्याकडे ICC अकादमीचे ग्लोबल ट्रेड प्रमाणपत्र/LIBF चे इंटरनॅशनल ट्रेड फायनान्स (CITF) प्रमाणपत्र/IIBF चे इंटरनॅशनल ट्रेड प्रमाणपत्र आणि ट्रेड फायनान्स प्रोसेसिंग आणि ऑपरेशन्समध्ये किमान १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसर MMGS-II पदासाठी शैक्षणिक पात्रता समान आहे पण अनुभव ३ वर्षांपर्यंतचा असणे गरजेचा आहे.
वयोमर्यादा किती?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसर (जेएमजीएस-I) पदासाठी उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. एमएमजीएस II स्केलसाठी किमान वय २३ वर्षे आणि कमाल वय ३२ वर्षे असावे. वयोमर्यादेची गणना ३१ जुलै, २०२६ रोजीच्या स्थितीनुसार केली जाणार आहे. नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये ३ ते १५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
पगार किती असेल?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला असणार आहे. मूळ वेतनासोबतच उमेदवारांना महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), शहर नुकसान भरपाई भत्ता (CCA), भविष्य निर्वाह निधी, अंशदायी निवृत्तीवेतन निधी, राष्ट्रीय सार्वजनिक सेवा (NPS), रजा प्रवास सवलत (LFC), वैद्यकीय सुविधा आणि इतर भत्त्यांचा लाभ मिळणार आहे.
कनिष्ठ व्यवस्थापन श्रेणी वेतनश्रेणी-१: वेतनश्रेणी ४८४८० ते १८५९२० रुपये इतका असेल.
मध्यम व्यवस्थापन श्रेणी वेतनश्रेणी-२: वेतनश्रेणी ६४८२० ते १९३९६० रुपये इतका असेल.
निवड प्रक्रिया कशी असेल?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. बँकेच्या शॉर्टलिस्टिंग समितीने यासाठी निकष निश्चित केले आहेत. या निकषांच्या आधारे उमेदवारांची मुलाखतीच्या फेरीसाठी निवड केली जाईल. त्यानंतर १०० गुणांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामध्ये निवड झालेल्यांना नोकरी मिळेल.















Discussion about this post