मुंबई : राज्यातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेल विक्रीबाबत मोठा इशारा दिला आहे. राज्यात सुट्ट्या स्वरूपात खाद्यतेल विक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही सुट्टे खाद्यतेल खरेदी करू नये, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.
‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात कारवाई सुरू आहे. यापूर्वी अॅनालॉग पनीर तसेच खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाई करण्यात आली. आता प्रशासनाने खाद्यतेल विक्रीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
खाद्यतेलात अनधिकृत मिश्रणाचा मुद्दा
राज्यात काही ठिकाणी नोंदणी नसलेल्या खाद्यतेल कंपन्या आढळून आल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. खाद्यतेलात भेसळ तसेच परवानगी नसलेले मिश्रण केले जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. विशेषतः मोहरीच्या तेलाबाबत कोणतेही अनधिकृत मिश्रण करता येणार नसून, मोहरीचे तेल १०० टक्के मोहरीचेच असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खाद्यतेलाची विक्री पॅकेजिंगमध्येच केली जावी, असा नियम आधीपासूनच असल्याचे मुंढे यांनी सांगितले. मात्र, सध्या अनेक ठिकाणी सुट्टे तेल विकले जात असल्याने त्याच्या स्रोताबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे अशा तेलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हॉटेलमधील वापरलेल्या तेलावरही लक्ष
हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये तळण्यासाठी वापरलेले तेल वारंवार वापरले जात असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा पद्धतीने तेलाचा पुनर्वापर केल्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे खाद्यतेलाच्या वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
नियम मोडल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
खाद्यतेलाच्या वापरासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असल्याचे मुंढे यांनी सांगितले. तसेच ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, नागरिकांनी सुट्टे खाद्यतेल खरेदी करू नये आणि शक्यतो पॅकेजिंग केलेले, अधिकृत कंपनीचे खाद्यतेलच वापरावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खाद्यतेलातील भेसळ आणि नियमबाह्य विक्रीविरोधात आगामी काळात कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post