जळगाव । शहरातील शनीपेठ परिसरातील सराफा व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील दोघांनी व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून सुमारे १.७५ किलो वजनाचे २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेतले. मात्र, त्याच्या मोबदल्यात देण्याचे ठरलेले २४ कॅरेट सोन्याचे बार किंवा रोख रक्कम परत न करता दोघांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यवहारातून वाढवला विश्वास
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनीपेठ परिसरातील आयुष ज्वेलर्सचे व्यावसायिक नबाबकुमार गौरहारी धारा (वय ४१) यांच्याशी पश्चिम बंगालमधील विद्युत निरोध बाग (वय ३१) आणि राजू बिपीन चौधरी यांनी संपर्क साधला होता. व्यवहाराच्या माध्यमातून दोघांनी सराफा व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑक्टोबर २०२५ ते ३० मे २०२६ या कालावधीत त्यांनी दुकानातून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१.७५ किलो सोन्याचे दागिने घेतले
आरोपींनी तब्बल १,७५५.३४० ग्रॅम म्हणजे सुमारे १.७५ किलो वजनाचे २२ कॅरेट सोन्याचे तयार दागिने घेतले. या दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपये असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे.
दागिने घेतल्यानंतर आरोपींनी त्याच्या बदल्यात २४ कॅरेट शुद्ध सोन्याची लगड किंवा त्याची रोख किंमत परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दागिने ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे सोन्याची लगड अथवा पैसे परत केले नाहीत.
वारंवार मागणी करूनही टाळाटाळ
दागिन्यांच्या बदल्यातील रक्कम किंवा सोन्याची लगड परत मिळावी यासाठी सराफ व्यावसायिकाने आरोपींकडे वारंवार मागणी केली. मात्र, दोघांकडून टाळाटाळ करण्यात आली. अखेर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ३१६(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींचा पश्चिम बंगालमध्ये शोध
दोन्ही आरोपी पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याने पोलिसांसमोर त्यांना शोधून ताब्यात घेण्याचे आव्हान आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींच्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर करीत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची कार्यवाही सुरू आहे. या फसवणुकीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच सोन्याचे दागिने नेमके कुठे वळवण्यात आले, याचाही तपास केला जात आहे.















Discussion about this post