जळगाव जिल्ह्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील मिळून तब्बल ९५३ शिक्षक पदे भरली जाणार आहेत.
यामध्ये प्राथमिक विभागातील ४५६, तर माध्यमिक विभागातील ४९७ पदांचा समावेश आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TAIT-2025 मध्ये सहभागी झालेल्या पात्र उमेदवारांना या भरती प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे शिक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या तरुणांना मोठी संधी मिळाली आहे.
प्राथमिक विभागात ४५६ पदे
प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त पदांमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या जागांचा समावेश आहे. मराठी माध्यमासाठी २५१ पदे, तर उर्दू माध्यमासाठी २०५ पदे उपलब्ध आहेत. मराठी माध्यमातील जागांमध्ये इयत्ता १ ली ते ४ थी/५ वीकरिता १२६ पदे आहेत. तसेच इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता गणित-विज्ञान विषयाची ८३, इंग्रजी विषयाची २०, मराठी विषयाची ११ आणि हिंदी विषयाची ११ पदे भरण्यात येणार आहेत.उर्दू माध्यमात इयत्ता १ ली ते ४ थी/५ वीकरिता १५० पदे असून, इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता गणित-विज्ञान विषयाची ३७ आणि उर्दू भाषा विषयाची १८ पदे उपलब्ध आहेत.
माध्यमिक विभागातील ४९७ जागांवर भरती
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार १३८ माध्यमिक शाळांमध्ये एकूण ४९७ पदे रिक्त आहेत. या पदांवरही भरती केली जाणार असल्याने प्राथमिकसह माध्यमिक स्तरावरील उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.
कोणते उमेदवार पात्र?
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असणे आवश्यक आहे. इयत्ता १ ली ते ५ वी तसेच इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षक पदांसाठी संबंधित TET/CTET पात्रता पूर्ण असणे गरजेचे आहे. यासोबतच TAIT-2025 परीक्षेत सहभागी होणे आणि पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज करताना काळजी घेणे आवश्यक
पवित्र प्रणालीवर अर्ज भरताना उमेदवारांनी आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, आरक्षण प्रवर्ग, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अचूकपणे नमूद करावी. अर्जातील माहितीमध्ये चूक किंवा अपूर्णता राहणार नाही, याची उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, रिक्त पदांचा आरक्षणनिहाय आणि समांतर आरक्षणाचा तपशील जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत माहिती तपासूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. एकाच वेळी ९५३ शिक्षक पदांची भरती होणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.















Discussion about this post